Tuesday, May 28, 2013

फेकुनी द्या

फेकुनी द्या लेखण्यांना मुक्त व्हा हो
मोकळे आभाळवारे मस्त प्या हो

अक्षरांची जोखडे तोडुनी टाका
आणि हुंकारात ओले गीत गा हो

दांभिकांची कोरडी जाळा समिक्षा
ह्या दुतोंडी वास्तवाचे अस्त व्हा हो

कागदी अश्रू किती बांधाल दारी
कोवळा कालीजगाभा फक्त घ्या हो

कावळ्यांचे कोष ज्यांच्या भोवताली
त्या खुळ्यांना माणसांचे रक्त द्या हो

आज सोडा भाषणे मिंधेपणाची
त्या स्वयंभू भास्काराचे भक्त व्हा हो

(आभाळाचा अनुस्वार)

Monday, May 20, 2013

सम्भवा



पत्नी गबाळी गबाळी
कुंकू भाबडे सांभाळी
भार्या फितुर आतुर
भारी भाषण चतुर
जाया नातीगोती धुते
सासराचे ओढी जाते
बाईल हो जहांबाज
तिचा हटवादी साज
एक अशी अवदसा
खुंटीला ग टांगे वसा
महिलांचा लोंढा मोठा
अन्यायाला मारी सोटा
स्त्रीचा जन्म करूणाई
सोसण्य़ाचे गाणे गाई
विधवेच्या भाळावर
मेल्या मढ्याची मोहर
जशी होत जाते नारी
तिचा शब्द होतो भारी
तिचे नांव ना एकटे
नाते सदैव चिकटे
झाली दुर्गा भवानी ही
शौर्य जन्मभर राही
आणि कुमारिकांसाठी
उंबर्‍याची आडकाठी
किती भांडली तंडली
जग कांडपी कांडली
पुन्हा धून्सून उभी
नवी नववधू सभी
फक्त होते जवा आई
जग मूल मूल होई
रोज जन्म घेते नवा
युगायुगांची सम्भवा

(सम्भवा)

बिंधास राज्य माझे...



बिंधास राज्य माझे तेथून बोलतो मी
सूर्यास्त मंत्र ओठी आकाश तोलतो मी

प्राचीस पाखरांना घरटे बहाल करतो
ओठास पाकळीच्या हळूवर खोलतो मी

या ओंजळीत भरूनी विस्तीर्ण सागराला
बोटामधे नद्यांना घेऊन चालतो मी

निर्भीड गच्च काळा अंधार पांघरोनी
वारा शरीर होता वेळूत डोलतो मी

आयुष्य हे महाग कोणी हिशोब घ्यावा
रस्तेहि माणसांचे शिस्तीत कोलतो मी

(पालव)

Tuesday, April 30, 2013

हात


आदर हवा - आजोबा गरजला,
समज हवी - बाप वसकला,
पोरगा - फिदीफिदी हसला...

मी खणला पाया - आजोबा पुट्पुटला,
भिंती कुणी बांधल्या - बाप फुरफुरला,
छ्प्पर माझ्या हातात - पोरगं पुटपुटलं...

तिने एक कौल काढले सूर्याला आत घेतले,
तिने पोतेर्‍याने भिंतीला न्हाऊ माखू केले,
काजळ तीट लावून घर विंचरून घेतले,
तिने जमिनीखाली एक दिवा ठेवला
सर्वांचा काळोख पोटात भरला
नव्या जन्मावर उजेडाचा हात धरला
 

Wednesday, March 20, 2013

सुरक्षीत

असुरक्षीत वाटते आहे सारखे...
ही हवा, हे श्वास, ही फुलं!
माणसांचे स्पर्श झाल्यापासून,
त्यांना कुठेही ठेवा ते कोमेजुन जातात...
त्याना हवीये एकच निर्भय जागा,
कोणत्या धर्माने ती आरक्षीत केली नाही...
.
.
.
हे लिहीतानाही मी सुरक्षीत आहे?

प्रेमणा

.
मी पहाडाखाली ओणवा होवून जातांना
पहाड कोसळेलसे सारखे वाटत रहाते
तुझे तर पाऊल रोवले नाहीस ना त्यावर
मरणही सुगंधित होते म्हणतात ते असे!

.
काळजावर कातडी असते
हे किती चांगले!
एरवी ह्या कवितांनाही
काळोख आणि उजेडाचे
अर्थ कळले नसते.

.
तळाशी बुडून जाण्यापेक्षा विरघळून जावे
मिसळण्याचे अर्थ कळतात निदान सरल्यावर
मरणापूर्वी एकदाच मिठीचा मोर नाचव प्रेमणा
जिवंत अलिंगनापेक्षा मरणाची मिठी
कितीतरी सार्वभौम असते...
 

(आभाळाचा अनुस्वार)

मी भणंग झालो...


मी भणंग झालो तुझिया स्पर्शातून फिरता फिरता
लावतो लग्न कवितांचे अक्षरे उधळूनी आता

गे तुझा स्पर्श होताना गुलमोहोर हिरवा होतो,
मी सूर्य तांबडा झालो रक्तिमा प्राशूनी घेता

बांधले सदन गगनाचे, लाविल्या छ्तावर तारा,
अन अंगण झाले अपुरे पृथ्वीवर येता येता

आगीवर जाळीत गेलो षड:रिपूस औदार्याने,
शत्रूस म्हणालो स्वामी राखेतून उरता उरता

नात्यात अडकलो तेव्हा मी कुणाकुणाचा होतो?
बेछूट बहकलो आणि विश्वाचा झालो त्राता

मी देह सोडीला तेव्हा ते मडके फोडीत होते,
मी हसलो भस्मांगाने ज्वाळात लपेटून घेता

वाद्यात कोंबले त्यांनी ते राग, सूर समयांचे
हातावर तेव्हा माझ्या कोवळा षड्जही होता

येवोत कितीक लुटारू कातडी सोलण्यासाठी
बघ जगण्याचा कारंजा जखमेतून उसळत होता

अभ्रातून लुकलुकणारा कोवळ्या दवांत कसाही
उगवला दीस सृजनाचा ओठातून गाता गाता

अद्वैत उसासा होतो दोघांचा दोघांदाठी
कायेचा कापूर झाला चैतन्यस्पर्श तू करता