Tuesday, March 4, 2014

फरफट

क्षणात किती विसंगत होत जातो आपण
प्रारब्धाच्या गोष्टी भविष्याला बांधतो
आणि स्वप्नांना भुतकाळाशी सांधतो
आणि पुन्हा जगाला विचारीत राह्तो
’माझी फरफट कोणी केली?’

रंग

भाग्य असते काळे कुळकुळीत की पांढरेशुभ्र?
आपणच रंग दिले नशिबाला
आणि कण्हत राहिलो श्वासातुन
पण मला कळते
माझ्या लेखणीतुन उगवतो ना शुभ्र काळोख
आणि काळा तुकतुकीत उजेड!

कळशी

एका जगावर दुसरे जग ठेवता येत नाही
कळशीवर कळशी ठेवावी तशी!
त्यासाठी कळशीखालचे मस्तक
दारिद्र्याने गांजलेले, श्रमांनी पिचलेले, दु:खाने थिजलेले असावे लागते!
मग आपल्याच अश्रुंच्या पाणवठ्यावर तहानेची भीक मागता येते
आता कुठल्या कळशीत तुझे जग भरशील?
वरच्या की खालच्या?
आधी मस्तक शोध कळशी उचलणारे!

रोजीनिशी


किती लिहीतो?
किती लिहीले?
धरून ठेवू पाहिले अक्षरांच्या दोरखंडांनी
वळ उठले आयुष्यभर... ओळीओळींचे!
सकाळ होताच भविष्य किलकिलते उघड्या दिवसाच्या डॊळय़ातून
बाकी रोजीनिशी लिहिण्यासाठी कोणी श्वास घेत नाही!