Friday, December 28, 2012

थेंब


थेंब रुखासुखा एक थेंब रूखासुखा
पापणीत झुलतोय एक ओला झोका

देठ वनमाळी
लावण्य पाकळी
ओठावर टिपल्या मी गंधाळल्या चुका

मेघात मयुर
पिसारा फुलोर
भिजलेली काया माझी चातक हा मुका

ढगाळ साजण
घेई लपेटून
बरसते धून चुके आभाळाचा ठोका

गर्जला आषाढ
श्रावण झिम्माड
काळजात मंद मंद पागोळीचा ठेका

(सम्भवा)

बुद्धिबळ


उंट म्हणे
चालतो तिरका
मान ओढा
हसेल बरकां

हत्ती चालतो
काटकोन धरून
प्यादी फेकतो
सोंडेत धरून

घोडा अडीच
घरं फिरतो
त्याचा लगाम
राजा धरतो

गाढव एकदा
खेळात आले
राजा वजीर
पळून गेले

(झुळ झुळ झरा)

कसे

आभाळ कसे
आभाळ कसे
पांढरे निळे
लाखो ससे

गवत कसे
गवत कसे
हिरवीगार
झुलती पिसे

पाणी कसे
पाणी कसे
झुळझुळणारे
गाणे जसे

बाळ कसे
बाळ कसे
देवाघरचे
पापे जसे

(भिंगर भिंगरी)

भेट...

म्हणालिस,
'मला भेट दे'
म्हटलं, 'मलाच घे'
म्हणालिस,
'नको, पेक्षा तुझ्यातला 'तू' काढून ठेव
मग स्विकारीन तुला’'
आता मी चालतो
तेव्हा लोक हसतात मला
माझ्या मागे सावली असते तुझी
आणि
पुढे लख्ख लोवळे ऊन


(पालव)

परब्रम्ह भेटि लागी

परब्रम्ह भेटि लागी, धरेवरी आले
सूर सूर चैतन्याचा, रोम रोम झाले

वेद वेदनांचे गाती पुरे हा प्रवास
अगा आनंदाचे गाणे फुटे पहाटेस
चांदणे फुलांच्या ओठी फुलारून आले...

तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही
तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही
विश्व आत्मरूपी अवघे एकरूप झाले...

(नाटक: कधितरी कोठेतरी,
लेखक: कै.वसंत कानेटकर,
संगित:कै.पं.जितेंद्र अभिषेकी)


आई...

तुझिया डॊळ्यात । तेवते समई ।
वाहते गोदाई । रुधिरात ॥

जन्माचे औक्षण । अक्षरांनी केले ।
घास भरवीले । अभंगांचे ॥

आभाळ फाडूनी । प्रपंची लाविले ।
ओवीने ओवेले । आयुष्यहे ॥

तुझ्या कुसवांत । वाढला ओंकार ।
त्याचा गा हुंबार । परिसावा ॥

(निरुपण)