Thursday, November 28, 2013

कवितेचे दिसणे


कवितेचे दिसणे म्हणजे आपण नसणे
गर्भात उमलते मूल मनाशी हसणे
पान्हावुन येते कूस जगन्मातेची
रे कविता म्हणजे कुशीत जाऊन बसणे

ही कविता करते अशी जिवची लाही
कुरतडतो कागद लिहितो काहीबाही
जलधारांमध्ये सचैल भिजता भिजता
का वणवा आतला अजून पेटत राही

कवितेचा होतो जाळ पेटते पाणी
ही कविता होते थंड गोठती गाणी
कवितेचा जेव्हा ओठ जरा थरथरतो
ओळींवर हिरव्या बागडते फुलराणी

कवितेचा होतो स्पर्श लहरते काया
एकटेपणा लागतो असा बोलाया
रे फिरतो वणवण होत जगाशी परके
उबदार असे शब्दांची सोबत माया

काळीज कसे कवितेचे ओले असते
कोरडी कातडी बघून केव्हा रुसते
एकांतसमुद्री बुडते ज्याची भाषा
स्वप्नात तयाशी कविता बोलत बसते

(
आभाळाचा अनुस्वार)

वाट


तू ही अक्षरे गोळा करून
काय करतो आहेस ह्या नि:शब्द अरण्यात?

इथे शब्द पेरीत नाहीत त्यांचा श्वास मातीत
देठावर आशयाचे फूल मौनमुग्ध
आणि फुलात सुगंधाच्या गुदमरलेल्या हाका...

झाडाला असतील उकार वेलांट्यांसारख्या
फांद्या, अक्षरांना हुंदडण्यासाठी

पण गदागदा हलवले झाड
तरी सडा तर पडणार नाहीच
पन सळसळीचा हुंकारही
पानातून येणार नाही...

तू हा पाचोळा घेऊन
कुणाची वाट पाहतो आहेस?
ठिणगीची?....

(आभाळाचा अनुस्वार)
 

Tuesday, October 8, 2013

रुबाई...


१) हे रोज झगडणे ध्येयासाठी कशाला
काबाडकष्ट अन दगदग हवी कशाला
हे बरे, आहे त्या स्थितीत मस्त रहाणे
अन शांत निजावे घेऊन दैव उशाला

२) आम्ही युगायुगांचे नशाबाज शब्दांचे
ते ढोसुन ढोसुन अट्ट्ल बनलो नाचे
ही पुचाट व्यसने तुम्हास हो लखलाभ
दररोज पितो रे अर्क चंद्रसूर्याचे

३) ह्या रस्त्यावरती मुडदे रोज पहातो
डोळ्यावर पट्टी बांधून चालत र्‍हातो
भोसकले कोणी गळा दाबला तर मी
राष्ट्रगीत तेव्हा उच्च रवाने गातो

(मी मृगजळ पेरीत)
 

Monday, September 9, 2013

तुझे आणि माझे

तुझे आणि माझे
नसतेच काही
नुसतीच लाही      फुटफुटे

तसे आपलेसे
कुणीही नसते
प्रारब्ध हसते        पानोपानी

दूरस्थाच्या खुणा
हाकारती नित्य
एकट्याचे सत्य      पोरकेसे

तेव्हा आणि आता
नसतो फरक
स्वर्ग नि नरक     जसे शब्द

तुझे आणि माझे
असलेच काही
कळायाचे नाही      दोघांनाही

(निरूपण)

अभंग


होतात? होऊ दे
कवितांच्या ओळी
           कानांच्या पाळी
तापणार

जातात? जाऊ दे
शब्दही गळून
           थोडेसे जळून
पहावे ना!

येतात? येऊ दे
काळजांचे ठोके
           तेवढेच जागे
स्पर्शसुख

(निरूपण)

Monday, July 15, 2013

पातेलं

पातेलं घासून घे तुझं
खरवडून घे घासणीने
काथ्या वीटेचे तुकडे वापर
खसखसून घास
झालीस लख्ख चकचकीत
आतबाहेर?
आता अधाण ठेव तुझ्या चुलीवर
आच लागू दे पुरेशी
इतके उन्हाळे देहात पाळले ना मग आता
उकळी फुटू दे ना उन्हाला
लोक म्हणतील
हे पातेलं किती छान! गरम लौकर होतं
पटकन शिजतो पदार्थ त्यात
कितीएही कोचे पारा
पुन्हा ठाकून ठोकून वापरायला तयार
काळं प्डलं तरी सोलटून घ्यायला तयार
वापरून घ्या ह्या जन्मी
वापरत रहा जन्मोजन्मी...


(सम्भवा)

Sunday, July 14, 2013

संदर्भ


तो म्हणाला
समजून घ्यायला हवा स्पर्श करण्यापूर्वी
ती चाळत राहिली शरीराचे पुस्तक रात्रभर
वाटले सापडेल, समजेल करता करता
पेंगुळली दचकून उत्तर सापडल्याच्या आनंदात उठली
पुस्तकात त्याचीच खूण
संदर्भ म्हणून

(
सम्भवा)

Tuesday, May 28, 2013

फेकुनी द्या

फेकुनी द्या लेखण्यांना मुक्त व्हा हो
मोकळे आभाळवारे मस्त प्या हो

अक्षरांची जोखडे तोडुनी टाका
आणि हुंकारात ओले गीत गा हो

दांभिकांची कोरडी जाळा समिक्षा
ह्या दुतोंडी वास्तवाचे अस्त व्हा हो

कागदी अश्रू किती बांधाल दारी
कोवळा कालीजगाभा फक्त घ्या हो

कावळ्यांचे कोष ज्यांच्या भोवताली
त्या खुळ्यांना माणसांचे रक्त द्या हो

आज सोडा भाषणे मिंधेपणाची
त्या स्वयंभू भास्काराचे भक्त व्हा हो

(आभाळाचा अनुस्वार)

Monday, May 20, 2013

सम्भवा



पत्नी गबाळी गबाळी
कुंकू भाबडे सांभाळी
भार्या फितुर आतुर
भारी भाषण चतुर
जाया नातीगोती धुते
सासराचे ओढी जाते
बाईल हो जहांबाज
तिचा हटवादी साज
एक अशी अवदसा
खुंटीला ग टांगे वसा
महिलांचा लोंढा मोठा
अन्यायाला मारी सोटा
स्त्रीचा जन्म करूणाई
सोसण्य़ाचे गाणे गाई
विधवेच्या भाळावर
मेल्या मढ्याची मोहर
जशी होत जाते नारी
तिचा शब्द होतो भारी
तिचे नांव ना एकटे
नाते सदैव चिकटे
झाली दुर्गा भवानी ही
शौर्य जन्मभर राही
आणि कुमारिकांसाठी
उंबर्‍याची आडकाठी
किती भांडली तंडली
जग कांडपी कांडली
पुन्हा धून्सून उभी
नवी नववधू सभी
फक्त होते जवा आई
जग मूल मूल होई
रोज जन्म घेते नवा
युगायुगांची सम्भवा

(सम्भवा)

बिंधास राज्य माझे...



बिंधास राज्य माझे तेथून बोलतो मी
सूर्यास्त मंत्र ओठी आकाश तोलतो मी

प्राचीस पाखरांना घरटे बहाल करतो
ओठास पाकळीच्या हळूवर खोलतो मी

या ओंजळीत भरूनी विस्तीर्ण सागराला
बोटामधे नद्यांना घेऊन चालतो मी

निर्भीड गच्च काळा अंधार पांघरोनी
वारा शरीर होता वेळूत डोलतो मी

आयुष्य हे महाग कोणी हिशोब घ्यावा
रस्तेहि माणसांचे शिस्तीत कोलतो मी

(पालव)

Tuesday, April 30, 2013

हात


आदर हवा - आजोबा गरजला,
समज हवी - बाप वसकला,
पोरगा - फिदीफिदी हसला...

मी खणला पाया - आजोबा पुट्पुटला,
भिंती कुणी बांधल्या - बाप फुरफुरला,
छ्प्पर माझ्या हातात - पोरगं पुटपुटलं...

तिने एक कौल काढले सूर्याला आत घेतले,
तिने पोतेर्‍याने भिंतीला न्हाऊ माखू केले,
काजळ तीट लावून घर विंचरून घेतले,
तिने जमिनीखाली एक दिवा ठेवला
सर्वांचा काळोख पोटात भरला
नव्या जन्मावर उजेडाचा हात धरला
 

Wednesday, March 20, 2013

सुरक्षीत

असुरक्षीत वाटते आहे सारखे...
ही हवा, हे श्वास, ही फुलं!
माणसांचे स्पर्श झाल्यापासून,
त्यांना कुठेही ठेवा ते कोमेजुन जातात...
त्याना हवीये एकच निर्भय जागा,
कोणत्या धर्माने ती आरक्षीत केली नाही...
.
.
.
हे लिहीतानाही मी सुरक्षीत आहे?

प्रेमणा

.
मी पहाडाखाली ओणवा होवून जातांना
पहाड कोसळेलसे सारखे वाटत रहाते
तुझे तर पाऊल रोवले नाहीस ना त्यावर
मरणही सुगंधित होते म्हणतात ते असे!

.
काळजावर कातडी असते
हे किती चांगले!
एरवी ह्या कवितांनाही
काळोख आणि उजेडाचे
अर्थ कळले नसते.

.
तळाशी बुडून जाण्यापेक्षा विरघळून जावे
मिसळण्याचे अर्थ कळतात निदान सरल्यावर
मरणापूर्वी एकदाच मिठीचा मोर नाचव प्रेमणा
जिवंत अलिंगनापेक्षा मरणाची मिठी
कितीतरी सार्वभौम असते...
 

(आभाळाचा अनुस्वार)

मी भणंग झालो...


मी भणंग झालो तुझिया स्पर्शातून फिरता फिरता
लावतो लग्न कवितांचे अक्षरे उधळूनी आता

गे तुझा स्पर्श होताना गुलमोहोर हिरवा होतो,
मी सूर्य तांबडा झालो रक्तिमा प्राशूनी घेता

बांधले सदन गगनाचे, लाविल्या छ्तावर तारा,
अन अंगण झाले अपुरे पृथ्वीवर येता येता

आगीवर जाळीत गेलो षड:रिपूस औदार्याने,
शत्रूस म्हणालो स्वामी राखेतून उरता उरता

नात्यात अडकलो तेव्हा मी कुणाकुणाचा होतो?
बेछूट बहकलो आणि विश्वाचा झालो त्राता

मी देह सोडीला तेव्हा ते मडके फोडीत होते,
मी हसलो भस्मांगाने ज्वाळात लपेटून घेता

वाद्यात कोंबले त्यांनी ते राग, सूर समयांचे
हातावर तेव्हा माझ्या कोवळा षड्जही होता

येवोत कितीक लुटारू कातडी सोलण्यासाठी
बघ जगण्याचा कारंजा जखमेतून उसळत होता

अभ्रातून लुकलुकणारा कोवळ्या दवांत कसाही
उगवला दीस सृजनाचा ओठातून गाता गाता

अद्वैत उसासा होतो दोघांचा दोघांदाठी
कायेचा कापूर झाला चैतन्यस्पर्श तू करता

Wednesday, March 6, 2013

म्‌ ची कविता

अगडम्‌ बगडम्‌ आहे तगडम्‌
गुरुजी म्हणती नुसता दगडम्‌
अस्सा वाईटम्‌ करतो फाईटम्‌
गुरुजी त्याला करती टाईटम्‌
डुलतम्‌ झुलतम्‌ झोपेत चालतम्‌
बाटलीत चंद्र बसतो घालतम्‌
कुत्र धावतम्‌ अगडम्‌ चावतम्‌
चालत चालत स्वर्गात जावतम्‌
वर्गात असतम्‌ दप्तर नसतम्‌
गुरुजींचा मग मारही बसतम्‌
अगडम्‌ बगडम्‌ रडतम्‌ खडतम्‌
वरच्या वर्गात चढतम्‌ चढतम्‌

(भिंगर भिंगरी)

गोगलगाय


वाघाला चावली
गोगलगाय
म्हणते कशी
सोडेल की काय?

वाघ लागला
जोरात रडू
म्हणते चूप
गळा नको काढू

नुसता पळतो
हळूहळू चाल
थंडी पडली
कपडे घाल

ओरडू नको
एकदा हस
गुपचुप शंखात
येऊन बस

(भिंगर भिंगरी)

Sunday, February 17, 2013

मनाच्या


मनाच्या डोहात
टाकला मी खडा
एकही शिंतोडा       उडेचिना---

मनावर कोणी
कोरली पापणी
तरी कसे पाणी     वाहेचिना---

मनावर अशी
दाटू लागे साय
तरी कशी माय     दिसेचिना---

आता कळो आले
आटलासे डोह
तरंगांचे मोह        खुळ्यालागी---

(पालव)

चांदण्या


डोळे गच्च मिटले की
आभाळाही डोळ्यात दाटून येतं म्हणे!
मला ते ठावूक नाही
माझ्या पापण्यांच्या केसात
चांदण्या कधीच्याच बसल्यात दडून.

(पालव)

प्रवास



तुरुतुरु धावणार्‍या मुंगीला विचारले
तुझा प्रवास कोठून कोठे
?
तिच्या कुजबुजण्याचा अर्थ कानांना समजत नाही
की माझ्या शब्दकोषात
पाचव्या युगाचे नावच नाही
?

(पालव)

होवो


तिला प्रथमच शिवलेला कावळा
पळत येऊन माझ्या कानात म्हणाला
तिला बंदिवान करून आलोय पुरता
तुझा प्रवास सुखाचा होवो!

(पालव)

Saturday, February 2, 2013

कुसुमाग्रज: काही स्पंदने

१.
लोकप्रियतेच्या शेपट्या लावून
भुभु:कार करणार्‍या कवड्यांच्या वराती
दारासमोरून जाताना
सारे शहर उत्सवाच्या दंगलीत उधाणत रहाते
शब्दांचा आतिषबाजीत अवघा लौकीक
उजळून निघताना मी एकाकी होत जातो
एकटा एकटा दूर आभाळाखाली
सताड...नग्न...उभा रहातो
माझे हात चांदण्यांचे...आणि
खांद्यावर निळा पक्षी थोपटणारा!

२.
आमच्या बापजाद्यांनी गायलेल्या
तुमच्या क्रांतीगीतांनी त्यांच्या निधड्या छातीवर
पदवी कोरली
आणि त्यांची विद्यापीठे झाली
कुलगुरूंच्या नेमणुकीशिवाय
कुलपतींच्या आदेशाविना
आज... मी प्रवेशद्वारावर उभा
माझ्या हातात पदव्यांच्या छापखान्यातून
बाहेर पडलेला एक कोरा कागद
आणि निधडी छाती? .... हो
डोनेशनच्या दम्याने पोखरून निघालेली
आणि ओठांवर क्रांतीगीत
बेकारीच्या भवितव्याचे
मला त्या विद्यापीठात प्रवेश हवाय

३.
मध्यरात्री तुळशीवृंदावनापाशी
आभाळमातीचे संदर्भ त्पासून पहाताना
पणतीवर कुठलीतरी फुंकर घातली
आणि पदरात काळोख फेकून
संस्कृतिचे विश्वस्त चालते झाले
तेव्हा तुम्ही... (शांतपणे)
कोलंबसाचे वादळ समुद्रात उगाळून
क्षितीजावर उष:काल लिहीला...

४.
पृथ्वीच्या हट्टासाठी प्रेम्गीत गावे
तर माणसे बेघर होतात
बासरीच्या सप्तकातून कृष्णाला मोकळा करून
कुब्जेला बहाल करावा
तर वस्त्यांना आगी लावल्या जातात
मोर्चा घेरावाचा गदारोळात
मी बावरून उभा
कुठलाच प्रदेश माझा नाही
कोणतीच भाषा माझी नाही
तुम्ही समिधा दिली खरी
पण यज्ञ कुठे करू?
मला बोट धरून माणसांची वस्ती दाखवाल?

५.
संज्ञेच्या सामर्थ्यावर शब्द जगतो
पण माणसांचा मागमूसही नसलेल्या
अरण्यात झाडांना पाणी कोण घालतो?
आणि फुलेही कोण खुडतो?
मला तो शब्दांचा किरण द्या
जो अभेद्य खडक फोडून
पाताळातल्या शेषाचे वीष नष्ट करेल
आणि आभाळाची अदृश्य पोकळी छेदून
नक्षत्रे ओंजळ भरून माणसांना वाटून देइल
तुमच्या अथांग डोळ्यात आकाशगंगा
गहिवरतांना मला दिसलीय...

(आभाळाचा अनुस्वार)



मर्ढेकर : एक संवाद



गोड हिवाळा पिणारे तुमचे चार शब्द
आज माझ्या ओंजळीत आहेत
आणि बोटांच्या फटीतून झिरपणारा आशय
मी तुमच्या स्वाधीन करीत आहे
मर्ढेकर,
आताशा उंदीर पिपात मरत नाहीत
ते फ्लॅटच्या बिळांमधून आत्मदहन करतात
परंपरा आणि नवतेचा सांगड घालतात
’सह नौ टरक्तु’ चा उदघोष करणारी मुंगी
स्वत:च्या वारूळात बसून समग्र क्रांतीवर
चार शब्द बोलतो... तेव्हा...
लोकलच्या वेळापत्रकाने गुदमरून गेलेला फलाटदादा
विडीचे दोन झुरके घेतो
आणि सौंदर्यमीमांसा धूर सोडतो
तेव्हा अवघी मराठी समीक्षा घुसमटून जाते...
मर्ढेकर,
आता एवढेच करा
कवितेच्या ओळीला ह्यांच्यापासून मुक्त करा
आणि तुमचे स्मारक होण्यापूर्वीच
गणपत वाण्याला सांगून
ह्यंचा हिशेब चुकता करा
पण जरा जपून...
कारण नवकवितेच्या काळजी वाहणारे चार सर्कारी कवी
तुमचा पुतळा उभारण्याच्या विचारत आहेत,
आणि त्याच त्याच पुतळ्यावर बसून कंटाळलेले कावळे
आणि पुतळ्यांना हर घालण्यासाठी हात शिवशिवत असलेले
मंत्री
नवकवितेच्या स्मारकाचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक आहेत
म्हणून म्हणतो.... मर्ढेकर....
आमचे बोट धरून पौर्णिमेच्य डोहात आम्हाला घेऊन चला
कितीतरी दिवसात आम्हीही चांदण्यात न्हालोच नाहीत...
मर्ढेकर...
हेही चांगलेच झाले
तुमच्या नावाचे कुंकू आमच्या कपाळाले लागले
कारण तुकारमानंतर तुम्ही
आणि तुमच्यानंतर आम्हीच.... म्हणनारे इथे येऊन गेले
..... चार दिवस राहून गेले.....
आज त्यांचाच वस्तीतून जाताना
आम्ही कुंकू मिरवीत जाऊ
मर्ढेकर,
तुमच्यासोबत कवितेचा नवा चंद्र पाहू....

(आभाळाचा अनुस्वार)

ओळ



तुझ्या ओळींवरून घसरताना काना भिंती उभारतात
वेलांटी छप्पर धरते, मात्रेमधून प्रकाशझोत झिरपतो
उकाराची उभार छाती रूकाराने झाकून स्तनाग्रांच्या अनुस्वाराने अर्थगर्भीत
ओळीच्या घरावर विसर्गाचे तोरण विरामचिन्हांची फुले अंगणभर

तुझ्या ओळीवर पसरताना अक्षराअक्षरात अडकतो श्वास
घट्ट मिठीत गुदमरून आवेगाने फडफडत रहावे सर्वांगाने तसा
विस्तारते आशयाचे अवगुंठन प्रदीर्घ चुंबनाच्या विलंबीत लयीत

तुझ्या ओळीत विसरताना स्व:तालाच शोधतो, थांबतो पूर्णविरामापाशी
मागे वळून पहातो गालाचे वाळवंट होताना
ओठांची पखाल घट्ट पकडून
पानोन पान करतो प्रवास न थकता

तुझ्या ओळीत सरताना विरघळतो पूड होऊन, उगाळत रहातो देह
कातडीची सहाण तुझ्या हातांच्या खोडाने घासताना गंध फुटेपर्यंत
उधळातो गच्च भीजगंध अक्षरांना फुटलेला

ओळ सरली तरी पसरत गेलेलो दोघं मैलोन मैल
दिवसेंदिवस... ’कवितोकविती’...

(कविता रती दिवाळी २०१२)

Friday, January 25, 2013

महान


तोही महान आहे हाही महान आहे
खोटे कशास बोलू मीही महान आहे

गुत्यात सर्व बंधू जाती न भेद  काही
मस्तीत ढोसण्याची ज्याला तहान आहे

बिल्ले किती यशाचे मागून आणले मी
लावू कुठे अता ते सदरा गहाण झाले

येथे बुलंद जो तो आपापल्या घरात
पगडी बृहस्पतींचे डोके लहान आहे

रोवून पाय पक्का राहू उभा कसा मी
चावे सदैव घेते असली वहाण आहे

(आभाळाचा अनुस्वार)

Thursday, January 24, 2013

एकदाच


एकदाच हास
एकदाच फूल
जगण्यासाठी
तेवढीच भूल

तेव्हाच पुरते
विरेल भान
नंतर शिवावा
लागेल प्राण

(आभाळाचा अनुस्वार)

दोर


दोर धरारे धरारे
माझे काळीज थरारे...

आर्त पाकळीचा धाक
देठ जळू झाला खाक
ऐका पारव्याची हाक
नेत्री काळोख भरा रे...

शुभ्र चिन्मयाची वाणी
दोईतून वाहे पाणी
जटा आपटावी कोणी
मौन गंगेचे झरारे...

झाले सुदृढ हे पाय
आत हंबरते गाउ
पोटी प्रसवली माय
फास जन्माचा करा रे...

(आभाळाचा अनुस्वार)

Thursday, January 17, 2013

आपण कसे असायचे असते

आपण कसे असायचे असते
आपण कसे हसायचे असते

पानवरल्या थेंबासारखे हळूच
पुसून जायचे असते
क्षितीजावरले गाणे कधी
डोळ्यात टिपून घ्यायचे असते
हातावरल्या रेषांनाही
मनात मोजून घ्यायचे असते
नशीब नशीब म्हणता म्हणता
ह्ळूच कपाळ पहायचे असते

आपण कधी कसे असतो
हे मुळीच माहीत नसते
आपण कधीच तसे नव्हतो
असेच पुन्हा सांगायचे असते
चांदण्यासुद्धा कशा हसतात?
ढगसुद्धा कसा रडतो
पानात सळसळ कशी येते
ओठात शब्द कसा अडतो
असे प्रश्न पडले की
आपलेच आपण ह्सायचे असते
आणि कधी उत्तर दिसलेच
तर डॊळ्यांवरती रूसायचे असते

कधी कधी उदास होवून
एक गाणे गायचे असते
पापण्यांमधे पाणी आणून
उगाच उगाच रडायचे असते
डॊळ्यांनाही टिपताना
हृदय पुसून घ्यायचे असते
आयुष्यातील एक पान
ह्ळूच गळून जायचे असते

कधी कधी जमलेच तर
एक गीत लिहायचे असते
कागदांवर शाईसारखे
रक्त ओतीत जायअचे असते
आपण असे ठरवाय्चे की
खूप खूप जगायचे असते
वरून हाक आली की
हळूच ओ द्यायची असते
हिशेबाची वही घेऊन
घेणे वसूल करायचे असते
जगणं सारं संपल की
हळूच मिटून घ्यायचे असते

आपण कसे असायचे असते
आपण कसे हसायचे असते

प्रेतावरल्या फुलासारखे
आपण आत हसायचे असते
चितेवरल्या राखेसारखे
चिमूट होवून जायचे असते
शेवटच्या पाण्यासाठी
घटकाभर बसायचे असते
जाता जाता चितेवरती
थोडेफार रूसायचे असते

(पालव) 

पावसाच्या कविता


)
मेघ, नभ, आकाश, आभाळ, वर्षा,
ढग, आषाढ, श्रावण, वीज ,बिजली
तू केस विंचरलेस आणि कितीतरी थेंब ओघळून गेले
मी इतकेच वेचले
आणखीन भिजली असतीस तर हातच पाणावले असते

*******************************************
)
अशीच मेघदूताविषयी बोलत असताना
तू गप्प झालीस
खिडकीतल्या चौकटीतून आभाळ निरखीत राहिलीस
मी जवळ घेऊन विचारल....
....आणि तुझे डोळे पाऊस
मी तुझ्याच पदराआड निवार्‍याला
.....वेडा....
 *******************************************
)
पाऊस.... तुझी माझी हौस
तू त्याला पाऊस म्हणतेस
आपण दोघे आळीपाळीने पाऊस बनतो
मग पाऊस कोण?
आपल्यातून आळीपाळीने निसटून गेलेलं
आयुष्य की आपण? 

*******************************************

(पालव)

Tuesday, January 15, 2013

ऊन पिवळे पडत चालले आहे...

ऊन पिवळे पडत चालले आहे
कधी बुबुळातून गळून पडेल याचा नेम नाही
पापणीचा देठ सुकून चाललाय
नजरेच्या पारंबीला धरून झुलता येणार नाही कुणालाच
ऊन गळून पडले तर अंधाराला रान मोकळे होईल
काळोख गिळून टाकेल शरीराचे झाड मातीसकट
ऊन जपायला हवे चटका बसला तरिही
ऊन टिकवायला हवे त्वचेच्या आत धग म्हणून
तळवे गरम होईल
कुशीत ऊब जन्माला येईल
हिरवी माया ओंजळीत घेईल...ऊन हवेच हवे...
कोणती काळजे कुरतडत असेल ऊन्हाला?
की दूरवर दूसरा प्रकाश उगवतो आहे
ह्याची भीती वाटते त्याला?
आपण जुने झालोत बुरशी आलीये किरणांना
आणि वास येतोय पुर्वेकडून
असे तर वाटत नाही
ऊन्हाच्या तळहातावरले जीवनसत्व नष्ट होते आहे
त्यानी गोंजारले तरी बरे होत नाहीत कातडीवरले डाग
वा रक्त वाहत नाही स्पर्शसुखाने आपसुक
ऊन अगतिक झाले आहे पराभवच्या धाकाने
आणि असहाय चैतन्यहीन चाहूलीने
ऊन आता पिवळसर डोळे किलकिले करून
आभाळाकडे आशेने पहाते नव्या सूर्याचा उदय होईल असे वाटते
ऊन्हाला आता आपलीही सावली असावी असे वाटते ते सावलीला टेकून
उभे रहाते आणि सावलीचे बोट धरून अस्ताचलाकडे सरकत जाते...
सरकत रहाते...

(काळोखाच्या वर प्रकाशाच्या खाली)

Monday, January 14, 2013

पणती


आपण सारे एकाच रस्त्यावर चालतो
तरी प्रत्येकाला
वेगळी सळसळ ऐकू येत?
काळोख विझवायला सारेच सज्ज
तरीही
प्रत्येकाची पणती वेगळीच असते.

(आभाळाचा अनुस्वार)

घडा


सये नगं बोलावूस
मले श्रावण माळाया
धनी मारल्या जखमा
आत्ता लागल्या वाळाया

कशापायी नगं पुसू
तेला कारन का हवं
सासरच्या वेशीवर
कुर्‍हाडीचं असे गाव

परसाच्या दारातली
मला भावते बावडी
पानी शेंदता करते
रिती अंधारकावडी

आभाळाच्या माहेरीचा
जवा सांगावा येईल
अवसेला बावडीत
घडा बुडून जाईल

(आभाळाचा अनुस्वार)

महाभारत घडते आहे


महाभारत घडते आहे
दूरदर्शनचे महाभारत रस्त्यावर घडते आहे...
टिव्हीच्या पडद्यावरला तलवारींचा खणखणाट
किती बेगडी वाटतो...
म्हणून, माणसे भर दिवसा रस्त्यावरून हातात नंग्या
तलवारी घेऊन धावत सुटतात
टोळ्या करून एकमेकांना भोसकाभोसकी करतात
तेव्हा आमचे भीष्माचार्य परदेशात आंतरराष्ट्रीय
शांततेचे करार करण्यात गुंतलेले असतात
द्रोणाचार्य परकीय हस्तकांना त्यांच्याच देशात
धनुर्विद्येचे प्रशिक्षण देत असतात
आणि कृपाचार्य, "परिस्थिती नियंत्रणाखाली असून तपास चालू आहे"
असं वारंवार सांगत असतात
महाभारत घडते आहे
दूरदर्शनचे महाभारत रस्त्यावर घडते आहे...

टिव्हीच्या पडद्यावरला द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग किती बेचव वाटतो
म्हणून, दुर्योधन आमच्या कुलवधुंना भर दिवसा
महाविद्यालयाच्या वर्गात कोंडतात
कर्ण उदार अंत:करणाने त्यांच्यावर
पेट्रोलच्या तीर्थाचा अभिषेक करतात
आणि दु:शासन सभ्यपणे
साडी न ओढता काडी ओढतात
तिच्या भुरुभुरु जळणार्‍या देहाकडे पहाणे
डोळ्यांना त्रासदायक असल्याने
गांधारीने आधीच डॊळ्यावर पट्टी सरकवलेली असते
आणि आमचे धृतराष्ट्र ह्यावेळेस
मुंबई आणि दिल्लीची सिंहासनं कुरवाळत असतात
महाभारत घडते आहे
दूरदर्शनचे महाभारत रस्त्यावर घडते आहे...

टिव्हीच्या पडद्यावरला अभिम्नन्यू किते छान युद्ध करतो!
चक्रव्युह भेदताना पाच पन्नास एक्स्ट्रा नटांचे प्राण घेतो
आणि मरता मरता चक्क छाती दाबून धरून भाषण देतो
इकडे आमच्या नव्नव्या उन्मेषांचे कोवळे अभिमन्यू
विषमता आणि अंधश्रद्धचे हजारो चक्रव्युह
रोजच्या रोज भेदत असतात, घायाळ होत असतात
आणि ह्यांनी मदतीची याचना केली तर
आमचे अर्जुन परदेशात शस्त्रे गहाण टाकून
बृहन्नडेच्या महालात मृदुंग वाजवीत बसलेले असतात
भीम गावच्या आखाड्यात सरपंच होवून घुमत असतो
आणि कृष्ण रानावनात गवळणींच्या मागे बासरी
वाजवीत भाकड गाईंचे रक्षण करीत असतो
अशावेळी कुणा एका महात्म्याने सांगितलेली गीता
ऐकण्यास झाडावर चिटपाखरूही नसते...
महाभारत घडते आहे
दूरदर्शनचे महाभारत रस्त्यावर घडते आहे...

टीव्हीचा पडदा छोटा असतो म्हणून आता पडद्यावरले
हे महाभारत पदद्याच्या सीमारेषा ओलांडून तुमच्याआमच्या
घरात घुसखोरी करीत अहे
हा प्रदेश आमचा असाच शंख फुंकीत आहे
हे अतिक्रमण थोपवयला हवे
हे असे कुंती सूर्याला सांगते आणि
एका नव्या अनौरस नात्याला जन्म देते
आता शेवट सर्वांचाच अटळ आहे
दुर्दैव एवढेच की
पडद्यावरले हे महाभारत बंद करण्याचे बटन आपल्या
हातात आहे हे धर्मराजाला माहीत नाही...
महाभारत घडते आहे
दूरदर्शनचे महाभारत रस्त्यावर घडते आहे...

(आभाळाचा अनुस्वार)

Friday, January 4, 2013

वारू


कसा सूर्यबिंबातला अस्त पाहू मनी घालिते गस्त ओली हवा
तुझ्या स्पर्शयात्रेतला एक वारू तुझा वक्षवेल्हाळ दे गारवा
तुझ्या दिव्यकांतीतली थंड माया त्वचेला कुणी घातले साकडे
खुळ्या पाखरांनी कधी चोच मारून जातील का ह्या नभाला तडे

(सम्भवा)

मुली


मुली बांधतो मी तुझ्या कृष्णकंठात लोभावल्या पाखरांचा लळा
तुझ्या मैत्रिणी घालिती शुभ्र हाका आणि गर्द काळोख होतो शिळा
तुझ्या धाकटीला उजेडात बांधू तिच्या घुंगरांच्या उशाला झळा
तिने धाडिले मोर चंद्रोदयाचे दिला तू तिला चांदण्यांचा गळा

(सम्भवा)

Wednesday, January 2, 2013

मराठीत बोला

मराठी लाघवी । गोड ज्ञानेश्वर ।
हसे चक्रधर । शब्दखळी ॥

महदंबा माया । मराठी जोजवे ।
शब्दांवा पाजवे । अर्थपान्हा ॥

मराठीत बोला । मराठीत चाला ।
मराठीत घाला । शिव्याशाप ॥

नको पप्पा-मम्मी । आई बाबा म्हणा ।
वात्स्ल्याच्या खुणा । शब्दोशब्दी ॥

दारावर पाटी । ऐटीत लावा रे।
स्वाक्षरी करा रे । मराठीत ॥

धन्यवाद म्हणा । नको सॉरी थॅंक्यु ।
थोडे थोडे रांगू । मराठीत ॥

ओठी होई स्तब्ध । मनी हो प्रक्षुब्ध ।
अंतरात लुब्ध । शब्द ऐसा ॥

अक्षरे वाजवा । टणत्कार होई ।
बंद्याची कमाई । रोखठोक ॥

मराठीत मिंधा । बोलता जो राहे ।
नक्कीच तो आहे । नतद्रष्ट ॥

चंद्रभागा आली । इंद्रायणी पाशी ।
मराठीची काशी । बुडी मारू ॥

होऊन निर्भय । गर्जा तिठी तिठी ।
आपुली मराठी । दिगंताची ॥
आपुली मर्‍हाटी । दिगंताची ॥

(निरूपण)
 

Tuesday, January 1, 2013

रूबाई


१) कुणी म्हणती जगणे आहे सुंदर कविता
कुणी म्हणते खडतर बडतर्फीचा खलिता
रे जगणे म्हणजे धनादेश हा कोरा
अन शाई संपते स्वाक्षरी करता करता

२) हे मित्र मैत्रिणी लबाड सारे खोट्टे
ह्या कविता गाणी रद्दी भंपक मोठ्ठे
पण संध्याकाळी काय होतसे आत
मन स्वैर धावते पुन्हा शोधण्या कट्टे

३) जो फुलात वसतो तोच सुगंधी असतो
जो खळाळ हसतो जिवंत तेव्हा असतो
जो क्षमस्व म्हणतो, क्षमा विसरूनी करतो
तो माणूस म्हणूनी अस्सल उठुनी दिसतो

४) पाठीवर नव्हता चंद्र चांदणी नव्हती
पोटात जळे अवसेची भोवळ भवती
तारांगण नुसते खुळखुळ वाजत होते
एकही पौर्णिमा मनात उगवत नव्हती

५) बखरीत अडकला प्राण म्हणाले राजे
वाळवी लागली स्मृतीस झटका राजे
तलवार नव्हे तर इथे गंजले मेंदू
मज श्वास एकदा मुक्त घेऊद्या राजे

(मी मॄगजळ पेरीत...)