किती लिहीतो?
किती लिहीले?
धरून ठेवू पाहिले अक्षरांच्या दोरखंडांनी
वळ उठले आयुष्यभर... ओळीओळींचे!
सकाळ होताच भविष्य किलकिलते उघड्या दिवसाच्या डॊळय़ातून
बाकी रोजीनिशी लिहिण्यासाठी कोणी श्वास घेत नाही!
तू तडफडते,
मी फडफडतो,
तू गडगडते,
मी धडधडतो
हृदय आणि आभाळ एकाच वेळी अनुभवतो आपण
एक बरसण्यापूर्वी भरून येते...सूचना देते
एक लखखते...झरून जाते...क्षणात थांबते
आपण सांभाळायची दोघांची लहर
पीत रहायचे जहर!
वेदनेचा द्रोण अस्थिर बुडाचा
तरिही आयुष्य पीत रहायचे त्यातून
फरक एवढाच
द्रोण कलंडला तर फेकून देता येतो,
नवा तरी मिळतो...
आयुष्य वाढता येत नाही पळी-पळीने!
पूर्ण चंद्रावर नाही बांधता येत छ्प्पर...
चवथीपर्यंत थांब!
चंद्रकोरीलाच अडकवू आयुष्याचे झुंबर
प्रत्येक लोलकातून फिरत राह्तील रंगीबेरंगी अनुभव
आणि
जगाला संभ्रमात टाकणे अधिक सोपे होईल!
बाळं गुणी झोपलियेत
त्यांना भीती नाही अंधाराची, बुवाची वा स्वप्नांची!
त्यांना आधार माझ्या थोपटण्याचा
आणि
विश्वास माझ्या तळहातावरच आहे त्यांच्या भवितव्याची शाल ह्याचा
बाळं अशीच झोपू दे विश्वाच्या अंतापर्यंत
जगही रांगू लागेल जगण्याच्या लयीत!